174. विकासाच्या वाटेवरील भारत!
उद्या भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 76 वर्षे पूर्ण होतील. या शहात्तर वर्षाच्या कार्यकाळात राज्यघटनेने देशाच्या अन् देशातील नागरिकांच्या विकासाला आधार पुरविला. या अनुषंगाने "राज्यघटनेच्या संरचनेचा" हा थोडक्यात आढावा...
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या तत्वांतून भारतीय संविधानाची 'तात्विक चौकट' निर्माण झाली. समता, समानता, बंधुता, न्याय यांच्या 'तात्विक भिंती' उभ्या केल्या गेल्या. अन् त्यावर स्वातंत्र्यचं 'तात्विक छत' उभारल गेलं. आजूबाजूला कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळांच 'तात्विक कुंपण' बांधलं गेलं. या कुंपणात नागरिकांसाठी न्यायाची, विचार-अभिव्यक्तीची, श्रध्दा-उपासनेची, समतेची, बंधुतेची 'तात्विक वृक्षे' रोवली गेली. अन् या सर्वांतून 'संविधानरूपी एक सुंदर बंगला' तयार झाला.
26 जानेवारी 1950 ला देशातील नागरिकांनी याच संविधानरूपी सुंदर बंगल्यात प्रवेश केला. शहात्तर वर्षांपासून आपण या बंगल्यात वास्तव्यास आहोत. घटनादुरुस्तीच्या रूपाने या बंगल्याची आपण वेळोवेळी डागडुजी करत आलोय. सोबतच या बंगल्याचे रक्षणही करत आलोय.
या बंगल्यावर कुण्या एकट्या-दुकट्याचा मालकी हक्क मुळीच नाही. या बंगल्याची निर्मिती देशातील प्रत्येक नागरिकासाठी झालीय. यामुळेच या बंगल्याच्या चौकटीवर, भिंतीवर, छतावर, कुंपणावर अन् बंगल्यातल्या वृक्षांवर देशातील प्रत्येक नागरिकाचा सार्वजनिक मालकी हक्क आहे.
तसेच या बंगल्याच्या चौकटीच्या, भिंतीच्या, छताच्या, कुंपणाच्या अन् बंगल्यातल्या वृक्षांच्या रक्षणाची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाची आहे.
या संविधानरूपी सुंदर बंगल्याच सौंदर्य येणाऱ्या पिढीलाही मिळावं अन् या बंगल्याच सौंदर्य अजून द्विगुणित व्हावं हीच इच्छा...
जय संविधान, जय भारत..!
~ सचिन विलास बोर्डे
40/4
Republic Day | Constitution | Making of the Constitution | Structure of the Indian Constitution | Republic | History | Polity | Democracy | Indian Constitution | Sovereignty | Socialism | Secularism | Equality | Equity | Fraternity | Liberty | Freedom | Legislature | Executive | Judiciary | Justice
Comments
Post a Comment