175. विकासाच्या वाटेवरील भारत!

दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर महत्वपूर्ण निर्देशात्मक निर्वाळा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले महत्वपूर्ण निरीक्षणे, आदेश आणि निर्देश या लेखातून समजून घेऊया...

शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींना "मासिक पाळीविषयक आरोग्य (Menstrual Health) आणि मासिक पाळीविषयक स्वच्छता व्यवस्थापनाची (Menstrual Hygiene Management-MHM) उपलब्धता" हे भारतीय राज्यघटनेच्या 'कलम 21 अंतर्गत प्रतिष्ठापूर्वक जगण्याच्या अधिकाराचा (Right To Life & Dignity)' भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे.

शाळांमध्ये अपुऱ्या सुविधा, योग्य सॅनिटरी उत्पादनांची कमतरता किंवा गोपनियतेचा हक्क नाकारल्याने मुलींना त्यांच्या शरीराची देखरेख त्यांच्या मनाऐवजी परिस्थितीनुसार करावी लागते. जेव्हा मुलींना कार्यक्षम स्वच्छतागृहे, पुरेशी सॅनिटरी उत्पादने, पाण्याची उपलब्धता आणि विल्हेवाटीची यंत्रणा उपलब्ध असेल, तेव्हाच विद्यार्थिनींना त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेच्या अधिकाराचा अर्थपूर्ण वापर करता येईल.

न्यायालयाचे मते, शाळांमध्ये या सुविधांचा अभाव असणे हे विद्यार्थिनींच्या 'प्रतिष्ठापूर्वक जगण्याच्या अधिकाराचे (Right To Live With Dignity), गोपनीयतेच्या अधिकाराचे (Right To Privacy) आणि शारीरिक स्वायत्ततेचे (Bodily Autonomy)' उल्लंघन आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी शहरी आणि ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी व्यवस्थापनाच्या प्रत्येक शाळेत स्वतंत्र आणि कार्यान्वित स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत. शाळांनी विद्यार्थिनींना "मोफत सॅनिटरी नॅपकिन्स" उपलब्ध करून दिले पाहिजेत. शक्यतो स्वच्छतागृहाच्या आवारातच 'Sanitary Napkin Vending Machines' द्वारे ही सोय करून द्यावी. याशिवाय मासिक पाळीविषयक आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी शाळांनी 'MHM Corners' स्थापन करणे आवश्यक आहे. ज्यात अतिरिक्त अंतर्वस्त्रे, अतिरिक्त गणवेश, विल्हेवाटीसाठी पिशव्या आणि इतर आवश्यक साहित्याचा समावेश असावा.

सर्वोच्च न्यायालयाचे हे आदेश, निर्देश अतिमहत्त्वाचे अन् अतिगरजेचे असल्याने देशातील सरकारी अन् खासगी शिक्षणसंस्थांनी याकडे तातडीने लक्ष पुरवायला हवे..!

~ सचिन विलास बोर्डे

41/1

Supreme Court | Article 21 | Menstruation | Menstrual Cycle | Free Sanitary Pads | Women Empowerment | Periods | Health | Right To Privacy | Right To Education | Right To Life | Right To Live With Dignity | Menstrual Hygiene Management (MHM) | Menstrual Health | Period Poverty | Schools | Education 


Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!