142. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेख क्र. 33/2 मध्ये आपण घरगुती हिंसाचाराच्या समस्येचा थोडक्यात आढावा घेतला. आजच्या लेखातून घरगुती हिंसाचारासंबंधीच्या केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या अहवालाचे विश्लेषण जाणून घेऊया...
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे "राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey-NFHS)" हा अहवाल प्रकाशित केला जातो.
2019-21 या वर्षाच्या 'NFHS-5' या अहवालानुसार,
भारतातील 18 ते 49 वयोगटातील 29% महिला वयाच्या 15 वर्षांपासूनच 'शारीरिक हिंसाचाराला' बळी पडलेल्या दिसतात. यातील 3% महिला गरोदर असताना शारीरिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत.
वयानुसार शारीरिक हिंसाचारात वाढ दिसून येते. 18 ते 19 वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण 16% आहे. तसेच 40 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये हेच प्रमाण 32% असल्याचे दिसते. अविवाहित स्त्रियांच्या तुलनेत 'विवाहित स्त्रियांमध्ये' शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण 31% आहे आणि शहरी भागात हे प्रमाण 24 टक्के असल्याचे अहवाल नमूद करतो.
18 ते 19 वयोगटातील 6% महिला आयुष्यात एकदातरी 'लैंगिक हिंसेला' बळी पडल्याचे अहवाल सांगतो.
या अहवालातील आकडेवारीतून हिंसाचाराच्या समस्येला अधिक सखोलपणे समजून घेता येते.
हिंसाचाराच्या समस्येवरील उपाय -
'आपल्यासोबत हिंसाचार होतोय, अन्याय होतोय' ही मूलभूत बाब महिलांना समजण्यासाठी स्त्रिया शिक्षित होणं अन् स्त्रियांचं सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे.
राज्यघटनेच्या कलम 14 नुसार भेदभावापासून मुक्ती,
कलम 15 अन्वये स्त्री पुरुष समानता आणि कलम 21 अन्वये जीवित व स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा हक्क पुरुषांप्रमाणे महिलांनाही दिला आहे. या तरतुदींची आणि Protection of Women from Domestic Violence Act, 2005 या कायद्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे ठरते.
मदतीसाठी 'राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन क्रमांक' '7827170170' किंवा '112' हा क्रमांक डायल करू शकता..!
~ सचिन विलास बोर्डे
33/3
NFHS | PWDV Act | Domestic Violence | National Commission for Women | Crimes Against Women | Women Safety | Women Empowerment | Gender Equality | Social Issues | Society | Awareness | Constitution | Fundamental Rights
NEXT 🔹 PREVIOUS
Comments
Post a Comment