162. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेख क्र. 37/4 मध्ये आपण वायू प्रदूषणाबाबत माहिती घेतली. आजच्या लेखातून "जल प्रदूषण
(Water Pollution)" समजून घेऊयात...
सुमारे चार अब्ज (4 Billion) वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली. पाण्यात रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्यातूनच सजीव उत्पत्तीस आले. पुढे विविध टप्प्यांतून उत्क्रांत होऊन या सजीवांनी आजवरचा विकास गाठला. थोडक्यात, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या 'उत्पत्तीसाठी' पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा ठरला.
29% जमीन अन् 71% पाणी अशी पृथ्वीची रचना.
या 71 टक्के पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी मानवाच्या उपयोगाचे आहे. उर्वरित 97% पाणी हे खारे असल्याने मानवी उपयोगात येत नाही. या 3 टक्के पाण्यापैकी 69% भाग बर्फ, हिमनद्यांनी, 30% भाग भुजलाने आणि केवळ 1% भाग तलाव, नद्यांनी व्यापलेला आहे. हेच 1% पाणी वापरण्याजोगे असल्याने या 1% पाण्यातूनच पृथ्वीवरील मानव प्रजातीला आपली पाण्याची गरज भागवावी लागते.
या 1% पाण्यातही बाह्य पदार्थ, विषारी घटक मिसळल्याने हे पाणी प्रदुषित होते. गावांतून, शहरांतून, औद्योगिक कारखान्यांतून येणारे सांडपाणी; कचरा, प्लास्टिक; शेतीतील खते, कीटकनाशके; तेल गळती इत्यादींमुळे पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक, आणि जैविक गुणधर्म बदलतात. अन् पाणी प्रदुषित होते.
याचा एकंदरित दुष्परिणाम मानवासहीत जलचरांवर, जैवविविधतेवर, हवामानावर अन् पर्यावरणावर होतो.
यामुळेच जल प्रदूषण थांबायला हवे. अन्यथा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या 'अंतासाठी' पाणी हाच घटक कारणीभूत ठरेल..!
~ सचिन विलास बोर्डे
38/1
Water Pollution | Water | Environment | Pollution Control | Science | Education | Awareness | Pollution | Environmental Protection | Climate Change | Earth | Ecology | Water Conservation
Comments
Post a Comment