148. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 34/3 मध्ये आपण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला होता. आजच्या लेखातून "दारू अथवा मद्यपानाच्या" सेवनाने होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया...

भारताची स्थिती -
केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या "राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey-NFHS-5)" नुसार, देशातील 22% पुरुषांना आणि 1% स्त्रीयांना दारूचे व्यसन असल्याचे दिसते. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, तेलंगणा या राज्यांत दारूचे व्यसन असणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवाल दर्शवित असला तरी, दारू पिणाऱ्यांची संख्या इतरही राज्यात आहेच.

स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक छळांच्या प्रकरणांत 71% प्रकरणांमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या छळास 'मद्यपान करणारा पती' जबाबदार असल्याचेही अहवाल अधोरेखित करतो.

मद्यपानाचे/दारूचे/अल्कोहोलचे दुष्परिणाम -
दारूच्या व्यसनाने यकृताचे आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोग, कर्करोग, पचनसंस्थेविषयक समस्या, मेंदू आणि मज्जासंस्थेविषयक समस्या, ताण-तणाव, इत्यादी आरोग्यावरील जीवघेणे दुष्परिणाम दिसून येतात.

दारूच्या नशेमुळे घरगुती हिंसाचार, भांडण-तंटे, मारामारी, विनयभंग, इत्यादी स्वरूपातील गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळते. दारूवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे दारूचे व्यसन आर्थिक नुकसान करणारे ठरते. याप्रकारे दारूचे व्यसन हे शारीरिक, मानसिक, आर्थिक दुष्परिणाम करणारे आहेच सोबतच हे व्यसन 'व्यक्तिप्रतिष्ठा अन् सामाजिक प्रतिष्ठा' कमी करणारे देखील आहे.

म्हणूनच जे व्यसनाधीन आहेत त्यांनी हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करावा अन् येणाऱ्या तरुण पिढीने या व्यसनाकडे वळू नये. हीच विनंती.
सदरील लेख जनहितार्थ प्रकाशित..!

~ सचिन विलास बोर्डे

34/4

Alcohol | Addiction | Cancer | Disease | Health | Public Health | NFHS | Domestic Violence | Crimes | Awareness 

Comments

Popular Posts

16. विकासाच्या वाटेवरील भारत!

154. विकासाच्या वाटेवरील भारत!

153. विकासाच्या वाटेवरील भारत!