151. विकासाच्या वाटेवरील भारत!
दोन दिवसांपूर्वी आपण 79 वा "स्वातंत्र्य दिवस" साजरा केला. हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांनी रक्ताचं अन् अनेकांनी पेनाच्या शाईचं योगदान दिलं. तुम्हा-आम्हाला अन् आपल्या भारताला पारतंत्र्यातून मुक्त केलं. हाच 78 वर्षांचा 'स्वातंत्र्य प्रवास' आजच्या लेखातून समजून घेऊया...
इतिहासात डोकावल्यास भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात 'भारतीय राष्ट्रवादाचं' महत्व लक्षात घेता येतं. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तत्कालीन बुद्धिजीवींनी, समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेचे शोषक रूप अधोरेखित केले. त्यातून भारतीय राष्ट्रवादाची पायाभरणी झाली. या राष्ट्रवादी विचाराने स्वातंत्र्याच्या ध्येयावर भर दिला. अन् 1947 ला हे ध्येय पूर्ण केले.
1947 नंतर स्वतंत्र भारताने स्वतंत्रपणे आपले ध्येय-धोरणे आखायला सुरुवात केली. या 78 वर्षांच्या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, भारतीय जनता पक्ष इत्यादी राजकीय पक्ष सत्तेत आले. सत्तास्थानी आलेल्या पक्षांनी भारताच्या विकासानुरूप विविध उपाय-योजना आखल्या. या पक्षांच्या ध्येय-धोरणांच्या यशापयशावरच आजच्या भारताला आपली 'प्रगती-अधोगती' साध्य करता आली.
या 78 वर्षांच्या काळात भारताने बऱ्याच क्षेत्रांत प्रगती केली
आहे. ही प्रगती निरंतर सुरू ठेवावी लागणार आहे. तसेच भारतासमोर विविध क्षेत्रातल्या समस्याही आहेतच. या समस्यांवरही उपाययोजना आखाव्या लागणार आहेत.
'भारताची ब्रिटिशांकडून सुटका' हे 1947 पर्यंत स्वातंत्र्याचं समीकरण होतं. आता हे समीकरण बदलून 'भारताची विविध क्षेत्रातल्या समस्यांतून सुटका' या स्वातंत्र्याच्या नव्या समीकरणावर इथल्या राज्यव्यवस्थेने, अर्थव्यवस्थेने, समाजव्यवस्थेने लक्ष पुरवायला हवं..!
~ सचिन विलास बोर्डे
35/3
India | Independence | Independence Day | Indian Nationalism | Future of India | Freedom Of India | Freedom Struggle | Post Independence | History | Politics | Society | Democracy
Comments
Post a Comment