184. विकासाच्या वाटेवरील भारत!
2011 नंतर तब्बल पंधरा वर्षांनी देशाची "जनगणना-2027 (Census-2027)" 1 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरची ही जनगणना आठवी आणि एकूण मालिकेतील सोळावी असेल. डिजिटल पद्धतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारी ही पहिलीच जनगणना असेल.
जनगणना-2027 'दोन टप्प्यांत' पार पाडली जाणार आहे.
'पहिला टप्पा' 01 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या दरम्यान पार पाडला जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात, 'घरयादी व गृहगणना (House Listing and Housing Census - HLO)' होईल. या टप्प्यात घरांची स्थिती, घरातील सोय-सुविधा, कुटुंबाविषयक माहिती या स्वरूपातल्या 33 प्रश्नांतून माहिती संकलित केली जाईल.
'दुसरा टप्पा' फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होईल. या दुसऱ्या टप्प्यात 'लोकसंख्येची गणना (Population Enumeration)' करण्यात येईल. या टप्प्यात लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक बाबी, शिक्षण, स्थलांतर, प्रजननक्षमता इत्यादी माहिती संकलित केली जाईल. जातीनिहाय माहिती याच टप्प्यात नोंदविली जाईल.
या दोन्ही टप्प्यांत जनगणना अधिकारी (Enumerators) द्वारे होणाऱ्या प्रत्यक्ष सर्वेक्षणापूर्वी नागरिकांना 15 दिवसाचा कालावधी मिळेल. या कालावधीदरम्यान नागरिक आपला स्वतःचा तपशील/माहिती 'स्व-गणना (Self-Enumeration)' च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने भरू शकतील. 'se.census.gov.in' या पोर्टल वर लॉगिन करून आपला आवश्यक तपशील नमूद करून, नागरिकांना 'Self-Enumeration ID (SE ID)' मिळेल. या ID चे जनगणना अधिकारी प्रत्यक्ष सर्वेक्षणादरम्यान पुनः तपासणी करतील.
जनगणनेदरम्यान नागरिकांची वैयक्तिक माहिती 'जनगणना अधिनियम 1948' अंतर्गत गोपनीय ठेवली जाते. शिरगणती अहवालातून प्रकाशित होणारी आकडेवारी अत्यंत महत्वाची असते. हीच आकडेवारी शासन-प्रशासनाला आणि देशाला आपल्या पुढील वाटचालीस दिशा देते. यामुळेच या जनगणनेच्या प्रक्रियेत देशातील प्रत्येक नागरिकाने सक्रियपणे सहभागी व्हावे, हेच या लेखाच्या माध्यमातून आवाहन..!
~ सचिन विलास बोर्डे
43/1
Census | Census 2027 | India Census | Digital Census | Population | Demography | Self Enumeration | Caste Census
NEXT 🔹 PREVIOUS
Comments
Post a Comment