145. विकासाच्या वाटेवरील भारत!

संतांची भूमी या नावे महाराष्ट्र ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूमीवर या संतांनी 'कीर्तनातून अन् अभंगांची' रचना करून समाज सुधारणेचं अन् समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं.
हीच बाब पुढील दोन अभंगातून समजून घेऊया...

अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर प्रहार करत तेराव्या शतकातील "संत नामदेव" लिहितात,
पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥
भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥
सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥
सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥
वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥
तोंड धरून मेंढा मारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥
सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥
अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८।
एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥
नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमटें ॥१०॥

या अभंगातून नामदेव 'दगडाच्या देवाला' नाकारतात अन् या दगडी देवाच्या अवतीभवती असलेल्या 'अंधश्रद्धेची' चिरफाड करतात.

नामदेवांच्या अभंगामुळे तुम्ही दगडी देव नाकारला तर 'अस्सल देव' शोधणार कुठं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता तुम्हाला सतराव्या शतकातल्या "तुकोबांची" मदत घ्यावी लागेल. तुकोबा सांगतात,
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥४॥
दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥६॥

याप्रकारे या संतांनी समाजव्यवस्थेतील उणिवा, असमानता, अंधश्रद्धा, चालीरीती, रुढी-परंपरा इत्यादींवर 'वार' केला.
अन् ते 'वारकरी' ठरले..!

~ सचिन विलास बोर्डे

34/1

Maharashtra | Saint | Social Reforms | Social Reformer | Saint Namdev | Saint Tukaram | Society | History | Superstition 

Comments

Popular Posts

47. विकासाच्या वाटेवरील भारत!

135. विकासाच्या वाटेवरील भारत!

151. विकासाच्या वाटेवरील भारत!