155. विकासाच्या वाटेवरील भारत!

10 ते 19 या वयोगटाला "किशोरावस्था (Adolescence)" समजले जाते. किशोरावस्थेच्या या टप्प्यात मुलामुलींत अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल घडतात. या तारुण्याच्या काळात शरीरात विविध हार्मोन्स निर्माण होतात. बुद्धीचा झटपट विकास सुरू होतो. मात्र 'पुरेशी समज' अजूनही या वयात निर्माण होत नाही.

या तारुण्याच्या अवस्थेत मुलंमुली नवनवीन गोष्टी जाणून घेण्यास 'अतिउत्साही' असतात. 13 ते 19 या वयोगटात हे प्रमाण अधिक असते. याच वयात या लेकरांना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदलांविषयी योग्य मार्गदर्शन मिळणं महत्वाचं असत.

हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात बहुसंख्य कुटुंबांकडे एकतरी 'स्मार्टफोन' बघायला मिळतो. अन् आता शिक्षणही डिजिटल झालंय. परिणामी या 13 ते 19 वयोगटातील लेकरांकडे 'शिक्षणाच्या हेतूने' स्मार्टफोन्स दिले जातात. मात्र अलीकडच्या काही काळात ही लेकरं शिक्षणाचा हेतू बाजूला सारून इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या 'आभासी दुनियेतच' मग्न होताना दिसताय.

तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही लेकरं योग्य मार्गदर्शनाच्या अभावाने अयोग्य दिशेने वाटचाल करतात. त्यांना सोशल मिडियाचं आभासी विश्व खरं वाटायला लागतं. इतरांकडे असलेले महागडे मोबाईल्स, घड्याळे, कपडे, चपला-बुटे इत्यादी गोष्टी आपल्याकडेही असाव्या अशा इच्छा ही लेकरं बाळगतात. इच्छापूर्तीसाठी बऱ्याचदा ते चुकीच्या मार्गाकडेही वळतात.

किशोरावस्थेत पदार्पण करणाऱ्या लेकरांना योग्य मार्गदर्शन देण्याची संयुक्त जबाबदारी 'पालक आणि शिक्षकांची' आहे. अन् मिळालेल्या योग्य मार्गदर्शनाच्या दिशेने वाटचाल करण्याची जबाबदारी लेकरांची आहे. ज्याने त्याने ज्याची त्याची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली तर निश्चितच 'सद्गुणी लेकरं' घडतील. अन् हीच लेकरं देशाला घडवतील..!

~ सचिन विलास बोर्डे

36/2

Adolescence | Teenagers | Parenting | Education | Childrens | Youth Development | Social Media | Digital Education | Moral Guidance | Youth Empowerment | Teachers | Parents 

NEXT 🔹 PREVIOUS

Comments

Popular Posts

154. विकासाच्या वाटेवरील भारत!

110. विकासाच्या वाटेवरील भारत!