159. विकासाच्या वाटेवरील भारत!
अलीकडेच भारत देशाच्या " सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला " झाल्याचे आपण सर्वांनी बघितले. एका हिंदू मूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता वकिलाने सरन्यायाधीशावर बूट फेकला. या स्वरूपातले हे प्रकरण आहे. सरन्यायाधीशाच्या वक्तव्याने ' धर्माचा अपमान ' झाला असे स्वरूप या प्रकरणाला दिले गेले. त्यात सरन्यायाधीश ' अनुसूचित जाती ' समूहातले. त्यामुळेच अपमानाचा बदला एकमेकांवर चपला-बुटे फेकून घेता येऊ शकतो ही युक्ती या ' अक्कलशून्य वकिलाने ' शोधली. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींची वर्तवणूक कशी नसायला हवी याचे हे वकील महोदय सर्वोत्तम उदाहरण. मंदिर, मशीद, विहार, चर्च, गुरुद्वारे इत्यादींच्या जीर्णोद्धाराच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणारेही तत्त्वज्ञानीच म्हणावे लागतील. देशाची राज्यघटना ' धर्मनिरपेक्षता ' शिकविते. ज्याचा अर्थ धर्माचे आचरण, प्रचार-प्रसार ही बाब व्यक्तीची खासगी बाब असेल. या तत्वाचा विसर पडला की जीर्णोद्धाराच्या याचिका न्यायालयात दाखल केल्या जातात. मूर्तींच्...